Sunday, February 26, 2017

मी कधीच नाही म्हटले की तू दे मज दर्शन

मी कधीच नाही म्हटले की तू दे मज दर्शन -      

होत्या लाटा उधळीत आपुली फेनिल कविता
फुलाफुलांतून अखंड उमलत होती नवता
होते वारे वाहत, तारे होते चमकत
बाभळीवर ही गुच्छ फुलांचे होते लगडत
रे कसे वेगळे म्हणू सांग तुज यांच्यापासून??
मी कधीच नाही म्हटले की तू दे मज दर्शन

उठूनि पहाटे जावे तर तू रंगच व्हावे
नभी पहावे तर तू ढग होऊन झुलावे
या धारातून तुझे कृपामाय हात दिसावे
किरणांच्या अधरांवर स्मित ताव फुलावे
हे डोळे भरुनी बघतो आहे सारे आनुंदीन
मी कधीच नाही म्हटले की तू दे मज दर्शन

तू नाहीस? या वसंतातुनी कोण फुले मग?
तू नाहीस? दवबिंदूत का मग झगमग झगमग
तुझ्यावाचुनी बीजांमधूनी कोण फुले रे?
तुझ्यावाचुनी रांगांमधून कोण फुले रे?
मी कधी न पाहिले तुझे निराळेपण त्याच्याविण
मी कधीच नाही म्हटले की तू दे मज दर्शन

हेलावे जनसागर माझ्या अवतीभवती
खरे सांग, ही नाना रूपे तुझीच नव्हती?
मनामनातून त्यांच्या होती तुझी चेतना
कर्माकर्मातून  होती तुझी प्रेरणा...!
मी कसे उणे तुज करू त्यांचिया सुखदुःखातुन ?
मी कधीच नाही म्हटले की तू दे मज दर्शन

तुला पाहिले ऋतुंऋतुंतुन, फुलाफुलांतून
त्या गगनातुन, या मातीतून, स्थितिगतीतून
संघर्षातुन , सुखदुःखांतून , व्यथेव्यथेंतून
या सृष्टीतून अन भावतीच्या मानवतेतून
रे कसे शोधू तुज वेड्यापरी मी तुलाच टाकून?
मी कधीच नाही म्हटले की तू दे मज दर्शन


- मंगेश पाडगावकर
















3 comments:

  1. Hi Mangesh Padgavkaranchi kavita aahe ki ba bha borkaranchi aahe...?

    ReplyDelete
  2. मंगेश पाडगावकर काव्य संग्रह जिप्सी कवितेचं नाव दर्शन

    ReplyDelete
  3. माझी आवडती कविता..

    ReplyDelete