Thursday, February 23, 2017

तिला विचारलंच नाही.

ज्या क्षणी पाहिले तिला...
होकार गृहीतच धरला...!
मी तुला आवडलो का...?
*तिला विचारलंच नाही...!!*

सप्तपदी चालतांना...
घुटमळली पाऊले तिची...!
हुरहुर कसली होती...?
*तिला विचारलंच नाही...!!*

माप ओलांडतांना उंबरठ्याचं...
मी आलो सहज आत...!
तुलाही यावंस वाटतंय का...?
*तिला विचारलंच नाही...!!*

झाली पहिली भेट...
किती आतुर होतो मी...!
ओढ तुलाही आहे का...?
*तिला विचारलंच नाही...!!*

वंशाला दिवाच हवा...
सांगून मोकळा झालो...!
पण आई व्हायचंय का...?
तिला विचारलंच नाही...!!

संगोपन करतांना मुलांचं...
कसरत होत होती तिची...!
गरज माझीही लागेल का...?
तिला विचारलंच नाही...!!

आयुष्यभर दिली साथ...
झाली सुख दु:खाची सोबती...!
कधी मन तिचं दुःखलं का...?
तिला विचारलंच नाही...!!

न मागताच तिच्याकडून...
घेतलं मी सारं काही...!
तुलाही काही हवं का...?
तिला विचारलंच नाही...!!

खरंच किती स्वार्थी झालो...
गृहीतच धरलं मत तिचं...!
तिचं मन काय म्हणतं...?
तिला विचारलंच नाही...!!

No comments:

Post a Comment