Friday, February 17, 2017

हा लेख  सकाळमध्ये श्री प्रसाद इनामदार यांनी लिहिलेला आहे... खुप सुंदर लिहिले आहे .... 

ती........
..पत्राच्या वरच्या मायन्यामध्ये सुरवातीला काही ओळी रिकाम्या सोडल्यात. कारण तेथे काय लिहायचं हे सुचलेलं नाही म्हणून नव्हे तर तेथे किती आणि काय-काय लिहायचं यावरून माझ्या मनात प्रचंड गोंधळ माजलेला आहे म्हणून. खरं तर खूप काही लिहावं, व्यक्त व्हावं, भावनांना वाट मोकळी करून द्यावी असं वाटूनही मी त्यांना बांध घालण्याचा प्रयत्न केलाय. कारण तेथे वापरावयाचे तोलामोलाचे शब्दच माझ्यावर रुसलेत. ते मला फितूरच होत नाहीत. कंटाळून मग मी तो प्रयत्न सोडून दिलाय. आता तुम्ही म्हणाल असं काय बुवा तेथे लिहिणार होतास? 

खरं तर मीही तोच विचार करतोय, आपण तेथे काय लिहिणार होतो? कारण मी जे लिहायचा विचार करतोय ते शब्दबद्ध करू शकेन हा विश्‍वासच माझ्या ठायी उरलेला नाही. कागद, पेन घेऊन सरसावून बसलोय खरा; पण तिच्याबद्दल मी विचार करू लागतो आणि "ती' मला असंख्य रूपांत भेटू लागते आणि मग त्यातल्या कोणत्याच रूपाला मी न्याय देऊच शकत नाही याची जाणीव मला मागे खेचून घेते कारण.... 

"ती' अंबिका..."ती' दुर्गा..."ती' सरस्वती..."ती' रणचंडिका..."ती' सीता..."ती' मंदोदरी..."ती' अहल्या..."ती' द्रौपदी..."ती' उर्मिला..."ती' सारा पुराण व्यापून राहिलेली त्यागाची मूर्ती... 
"ती' शिवबाला घडविणारी "जिजाऊ'..."ती' झाशीची राणी लक्ष्मीबाई...ती देशासाठी रक्त सांडलेली कणखर "इंदिरा', "ती' डेअरर किरण बेदी... 
"ती' वात्सल्यमूर्ती मदर तेरेसा... 
"ती' अनेक श्‍वासांना थबकवणारी गानकोकिळा लता... 
"ती' आयर्न लेडी... 
"ती'....ही यादी खूप मोठी...वाढतच राहणारी...कारण "ती' शब्दांत न मावणारी. 

...पण तरीही "ती' 
...माझी जन्मदात्री... वात्सल्यसिंधू... माझी दिशादर्शी... माझ्या पाऊलखुणा जपणारी...माझं बालपण हृदयात जपून ठेवणारी... जगाची ओळख करून देणारी... मुक्त विहरण्यासाठी माझ्या पंखांत बळ भरणारी... माझ्या यशासाठी कण कण झिजलेली... माझ्या इवल्याशा यशानेही आनंदून तृप्त झालेली...अजूनही होणारी... माझ्या चुका सुधारून मला जगण्याचं बळ दिलेली...देणारी....संसाराचा भार उचलून चेहऱ्यावर कष्टाचा मागमूसही न दाखविणारी... आणि खूप काही... माझी आई. 

"ती' माझ्यावर जीव ओवाळून टाकणारी.... माझ्या कर्तृत्वावर विश्‍वास ठेवून तिच्या आईला दुरावलेली....संसाराचा तोल सावरणारी...माझ्या यशावर जानसे फिदा झालेली.... माझ्यातल्या मला सावरणारी... मी चूक असलो तरी बरोबर मानून सप्तपदीचा मान राखणारी....हळुवार समजावणारी.... पत्नी.... प्रेयसी... माझी.... अर्धांगिनी.... माझ्या पिलांची "आई' आणि अद्यापही मला पुरती न उमगलेली माझी सखी. 

"ती' माझा अंश.... माझी प्रतिमा.... माझे प्रतिरूप.... माझ्या स्वप्नांची मुक्त भरारी.... छोट्याशा बाळमुठींतून माझ्या सुखांचे हळवे कोपरे समृद्ध करणारी.... माझ्यावर बिनधास्त विश्‍वासून आयुष्याला बेधडक सामोरी जाणारी.... सारं जग मुठीत घेऊन गगनाला गवसणी घालण्याची आकांक्षा बाळगणारी.... येणाऱ्या प्रत्येक क्षणांना भिडण्याची पात्रता अंगी बाळगणारी...."बाबा' या दोन शब्दांतून परमोच्च आनंद देणारी....सनई चौघड्यांच्या साक्षीने दुरावताना डोळे पुसून मलाच धीर देणारी... माझी चिमुरडी... माझी बालमैत्रीण.... 

"ती' बटवा घेऊन माझं बालपण जपणारी.... आयुष्यभराची शिदोरी पुरविणारी...ती संस्कारांचं बाळकडू पुरविणारी...माझ्या पाठी खंबीरपणे उभी राहणारी...चुकल्यावर कुशीत घेऊन समजावणारी.... माझ्यासाठी आईलाही "सुनावणारी' माझी मायाळू आजी.... 

या नात्यांशिवायही "ती' अनेक ज्ञात-अज्ञात रूपांतून भेटणारी...अमीट, असामान्य कामगिरी करणारी....जेथे आम्ही श्‍वास घेतो ती "वसुंधरा'....ती...."ती'....बस्स! आता मात्र किती लिहू आणि काय लिहू असं झालंय म्हणून थांबतो. 

आता आलं लक्षात, मी वरच्या मायन्यामध्ये काहीच का लिहू शकलो नाही. कारण माझ्यात "तिला' शब्दबद्ध करण्याचे बळच नाही. कारण "ती' अमर्याद, उत्तुंग, स्वच्छंद, गहिरी, अथांग, शब्दातीत आणि.... 
पाहिलंत असं होतं! 
"तिला' लाख-लाख प्रणाम!

No comments:

Post a Comment