Tuesday, July 18, 2017

कसे आहात ?
मजेत !
तुम्ही ?
मी पण मजेत !

अरे वा काय कमाल आहे ?
मी मजेत
तुम्ही मजेत
मग दुःखी कोण आहे ?

दुःखी ?
कुठंय कोण दुःखी ?
या एका प्रश्नावर
सारी जनता मुकी !

दुःख कुणी सांगत नाही
हेच मोठं दुःख
सुखी मात्र कुणीच नाही
एवढं मात्र पक्क !

दुःखाला वाटते
हसण्याची भीती
रोज सोबत राहून सुद्धा
माणसं राहतात रीती !

एकमेकाचा रितेपणा
घालवावाच लागेल
तरच माणूस चार दिवस
मजे मध्ये जगेल  !

बोलत बोलत हासलं की
डोळ्यात येतं पाणी
मग बघा दुःखाचीही
होतात गोड गाणी

कुणाच्याही दुःखाची
करू नका टिंगल
दुसऱ्याला हासल्यावर
कसे होईल मंगल ?

आपल्या बद्दल इतरांना
विश्वास वाटला पाहिजे
" आतलं दुःख सांगताना "
आधार वाटला पाहिजे

काळजाच्या कपारीतली
सल सांगत जावी
वेदना कमी करण्यासाठी
फुंकर घालत जावी

मग बघा माणसं कशी
आपसूक जवळ येतात
एकमेकाच्या दुःखाला
अलगद कवेत घेतात

इथे मजेत राहण्याचा
एकच उपाय आहे
मन मोकळं करण्यासाठी
माणूस हवा आहे !

No comments:

Post a Comment