Tuesday, July 18, 2017

अरण्यातही त्या सीतेला रामांचा सहवास,
घरात राहुन सौभाग्याविण उर्मिलेस वनवास!

सप्तपदी दोघीही चालल्या,कोठे झाली चूक,
तृप्ती एका नशिबी लिहिली दुसऱ्या नशिबी भूक!

लक्ष मनाने लक्ष्मणास ती एकटीच स्मरते,
स्मरण नव्हे ते मरण वाटते प्रतिक्षणी झुरते!

कुंकू आणखी हळदीमध्ये अंतर वर्षे चौदा!
का नियतीचा तिच्यासाठी हा क्रूर असा सौदा!

सीतेप्रमाणे नाही नशिबी आदर्शाची कथा!
अंधाराला कशी दिसावी अडगळीतली व्यथा!

जगास माहित कांचनमृग तो आणि अग्नीदिव्य!
वाल्मिकी नाही वाचू शकले माझे भवितव्य!

लक्ष्मण झाले मुर्छित कळले चौदा वर्षानी!
चौंदा वर्षे आंधळ्यापरी बघते स्पर्शानी !

वनवासातील सर्व श्वापदे जखमी करती इथे!
लक्ष्मण रेषा माझीसुद्धा दिसली कोणा तिथे?

ओलांडून मी गेले नाही चौदा वर्षे वेस!
वाऱ्यावरती नाही उडाला विंचरताना केस!

चौदा वर्षे रावण झाली जगले मी हालात!
नाथाविण मी अनाथ होते, इथे महालात!

रामायण माहीत जगाला ,नाही उर्मिलायण!
वनवासाहून महालात या मी फिरले वणवण!

प्रमोद जोशी. देवगड 9423513604

No comments:

Post a Comment