Tuesday, July 18, 2017

माझी मुलगी

छे ती कुठे माझी मुलगी
ती तर आहे श्वास माझा
उद्या मनांवर राज्य करेल
स्वप्नं नाही विश्वास माझा...

वडील होण्या इतपत जगात
कोणताच प्रचंड आनंद नाही
नि कन्या झाली तर कोणतचं सुख
त्याहून बेधुंद नाही...
.
मुठ आवळून तू बोट धरतेस
तो हरेक क्षण माझा खास होतो
तुझ्या इवल्या इवल्याश्या मुठीत
मला जग जिंकल्याचा भास होतो...
.
माझ्या गाण्यापेक्षा बेडकाचं
किंचाळणं जरी मधूर आहे
माझ्या अंगाईने झोपतं पिल्लू माझं
हे समाधान भरपूर आहे...
.
असावं लागतं पुण्यवान,
नि त्याही पेक्षा खूप भाग्यवान
ज्या पित्याचे हात उरकती
सर्वात श्रेष्ठ कार्य कन्यादान...
.
मुला-मुलीत भेदभावाचा
तो प्रश्नच मी उगारत नाही
वडीलांचं मुलीवर प्रेम जास्त
हे सत्यही मी झुगारत नाही...
.
संसारात रमण्या पेक्षा मी
मुलीच्या भातुकलीच्या खेळात रमतो
भावनांच्या खेळात आई नंतर
मुलीचाच तर क्रम येतो...
.
बाबा म्हणत माझ्या मुलीचे
जसे नाजूक ओठ हलू लागतात
समाधानाची इवली इवली फुलं
ह्या निवडुंगाच्या देहावर फुलू लागतात...
.
तू सुखी राहावीस
देवाकडे एवढचं मागणं आहे
म्हणूनच तुझ्या भविष्यासाठी
दिवसरात्र झिजणं, जागणं आहे...
.
आनंदाचे अगणित क्षण तिच्या
नाजूक हास्यात दडले आहेत
तिला कायम हसतं ठेवण्यासाठी
मलाही प्रयत्नांचे वेड जडले आहे...
.
भाग्य ज्याला म्हणतात ते
माझ्या मुलीतच सापडलं आहे
माझ्या ग्रहांचे मन कदाचित
तिच्याच पायांशी अडलं आहे...
.
मुलगी सासरी जाण्याचा क्षण
वडीलांसाठी मोठी अग्नीपरीक्षा असते
स्वतःच्या काळजा पासून दुरावणं
जगातली सर्वात मोठी शिक्षा असते...
.
आभाळा एवढं सुख काय ते
मुलगी झाल्यावर कळतं
एक वेगळच आपलेपण
तिचं प्रत्येक हास्य उधळतं...
.
इतरांचे नशीब घेऊन येतात
त्या बाबतीत मुली माहीर आहेत
मुलगी म्हणजे धनाची पेटी
हे सत्यही तसं जग जाहीर आहे...
.
मुलींचे एक छान असतं
मुलगी असण्याचा अभिमान असतो
त्यांचा अभिमान वडीलांसाठी
मान, शान व सन्मान असतो...
.
छे ती कुठे माझी मुलगी
ती तर आहे श्वास माझा
उद्या मनांवर राज्य करेल
स्वप्नं नाही विश्वास माझा...
कसे आहात ?
मजेत !
तुम्ही ?
मी पण मजेत !

अरे वा काय कमाल आहे ?
मी मजेत
तुम्ही मजेत
मग दुःखी कोण आहे ?

दुःखी ?
कुठंय कोण दुःखी ?
या एका प्रश्नावर
सारी जनता मुकी !

दुःख कुणी सांगत नाही
हेच मोठं दुःख
सुखी मात्र कुणीच नाही
एवढं मात्र पक्क !

दुःखाला वाटते
हसण्याची भीती
रोज सोबत राहून सुद्धा
माणसं राहतात रीती !

एकमेकाचा रितेपणा
घालवावाच लागेल
तरच माणूस चार दिवस
मजे मध्ये जगेल  !

बोलत बोलत हासलं की
डोळ्यात येतं पाणी
मग बघा दुःखाचीही
होतात गोड गाणी

कुणाच्याही दुःखाची
करू नका टिंगल
दुसऱ्याला हासल्यावर
कसे होईल मंगल ?

आपल्या बद्दल इतरांना
विश्वास वाटला पाहिजे
" आतलं दुःख सांगताना "
आधार वाटला पाहिजे

काळजाच्या कपारीतली
सल सांगत जावी
वेदना कमी करण्यासाठी
फुंकर घालत जावी

मग बघा माणसं कशी
आपसूक जवळ येतात
एकमेकाच्या दुःखाला
अलगद कवेत घेतात

इथे मजेत राहण्याचा
एकच उपाय आहे
मन मोकळं करण्यासाठी
माणूस हवा आहे !
बघ तुला जमतं का ..

तू देवासाठी उपवास कर किंवा नको करूस
मर्जी तुझी ....
जीभेवर ताबा नाही जमला तरी चालेल
पण तुझ्या मोहांवर मात्र मिळव विजय


तू देवळात रोज जा किंवा नको जाऊस
इच्छा तुझी ..
तीथे वाकला नाहीस तरी चालेल
पण तुझ्या अहंकारावर मात्र कर मात


तू सोवळं ओवळं मान किंवा नको मानूस
हक्क तुझा ते सर्व मानलं नाहीस तरी चालेल
पण  तुझे आचार मात्र ठेव पवित्र

तू पोथ्या - पुस्तकं वाच किंवा नको वाचूस
निवड तुझी त्यासाठी वेळ नसला तरी चालेल
पण आपल्या माणसांची मनं जरूर वाच

नाती

सुख ओरबडण्याच्या शर्यतीत
सामील होऊ नका
आपलं काही चुकतंय का ?
थोडं तपासून तर बघा

प्रेम , त्याग , सहनशीलता
ठेवावीच लागेल
आपल्या माणसाशी नातं तोडून
कसं काय भागेल ?

कौतुक करणारं असेल तर
मोठं होण्याला अर्थ असतो
लाखोंचं इंटेरियर करून सुद्धा
माणूस का उदास दिसतो ?

सुबत्तेच्या विळख्या मधे
खरंच सापडू नका
आपलं काही चुकतंय का ?
थोडं तपासून तर बघा

जगाशी मैत्री करतांना
मूळं  का उपटावीत
दूरचे जवळ घेतांना
सख्खे दूर का लोटावीत ?

पाणी आणि मृगजळ यातला
फरक लक्षात घ्या
नातं तोडणाऱ्या अहंकाराला
तिलांजली द्या

इतरांच्या सुखदुःखात
सामील व्हावच लागेल
तरंच  सोनेरी महाला मध्ये
तुमचं मन लागेल

मृत्यू जवळ दिसल्या नंतर
उपयोग काय ' नाती ' आठवून ?
जन्मभर का जगायचं
प्रेम आणि अश्रू गोठवून

आयुष्य फार छोटं आहे
दिवस भुर्रकन उडून जातील
Whats app , Face book वरून
फक्त " R I P " चे मॅसेज येतील

रक्ताच्याच नात्या मधील
काही डोळ्यात पाणी असेल
तुमच्या लेकरां-बाळा जवळ
काका , आत्या , मावशीच असेल

मतभेद जरी असतील काही
बसून , बोलून संपऊन टाका
ताठरपणा सोडून देऊन
बहीण , भावाला मारा " हाका "

Week end ला मॉल मध्ये
Aim less भटकू नका
आपलं काही चुकतंय का ?
थोडं तपासून तर बघा

मनाचं रंजन करण्यासाठी
माणूसच लागत असतो
संपत्ती कितीही असली तरी
" गप्पाची भीक " मागत असतो

नशिबाने मिळालेली
प्रेमळ नाती तोडू नका
आपलं काही चुकतंय का ?
थोडं तपासून तर बघा .
पावसाचं आणि धरणीचं, झालं एकदा ब्रेकअप..
रुसली धरणी, बिघडून गेला तिचा मेकअप..!

कधीच नाही भेटणार तुला,
पाऊस गेला सांगून..
धरणी म्हणाली मग त्याला,
मुकाट येशील मागून..!

रागाने पाऊस आपले, घेऊन गेला ढग..
जिरवूया आता म्हणे, धरणीची रग..!

हिरमुसली धरणी
अन सुकून गेल्या वेली..
सौंदर्याची तिची मग, रयाच गेली..!

तिला असे पाहून,
पावसा आले भरून..
काय उपयोग असतो, उगाच भांडण करून..!

मनातल्या मनात,
धरणी होती झुरत..
पावसा ये ना धावत,
मनी याचना होती करत..!

न राहावून पावसाने,
ढग केले गोळा..
चित्त नव्हते थाऱ्यावर,
भाव त्याचा भोळा..!

वाऱ्यासार होऊन स्वार,
तो आला प्रियेसाठी..
बिलगता धरणीची, गंधाळली माती..!

ओल्या त्याच्या स्पर्शाने, तिचे शहारले अंग..
अन पुन्हा मिळाला धरणीला,
तिचा हिरवा रंग..!

धरणी म्हणाली पावसाला,
पुन्हा कधीच नको भांडू..
विरहात सख्या माझे,
अश्रू नको सांडू..!
*जग कसं अजब आहे !*

देवावर प्रेम सर्वांनाच आहे.
...पण 'त्याच्या घरी' जायची
घाई मात्र कुणालाच नाही.

आपल्या घरात सर्वांनाच देव हवा.
...पण त्याच्या घरी आपण जायच्या
विचाराने मात्र मनात धडकी भरते.

देव आपल्या घरी आला म्हणजे,
'सण, उत्सव आणि आनंद.'
आपण त्याच्या घरी गेलो म्हणजे,
'दुःख, शोक.'

देव आपल्या घरी यावा म्हणून आटापिटा.
आपण त्याच्या घरी जाऊ नये म्हणून आटापिटा.

देवाघरून येणं म्हणजे 'जन्म'.
देवाघरी जाणं म्हणजे 'मृत्यु'.

दोन्ही अटळ आहे.
पण ह्यामधली जी गंमत आहे,
त्यालाच 'आयुष्य' म्हणतात.

                               _- व. पु. काळे_
Dedicated to P L Deshpande lovers..

१७ वर्ष झाली, भाई, तुम्हाला जाऊन.... तरी अजून रोज भेटता.... कधी वर्तमानपत्रातून, कधी पुस्तकातून, कधी ऑडिओ कॅसेट्च्या रूपात, कधी गाण्यात, कधी हार्मोनियमच्या स्वरात,  कधी जाहिरातीतल्या कोट्यांमधून....

अजूनही कधी एसटीच्या प्रवासात म्हैस आडवी जाते, तेव्हा तुम्ही भेटता.

डिजिटायझेशनच्या ह्या बदलत्या काळात रस्त्यानी एखादं साईन-बोर्ड पेंटिंगचं दुकान दिसलं की, तुमची आठवण येते.

पोस्ट खाती आता फक्त नावालाच उरली आहेत. पण, तुम्ही कथांमध्ये रंगवलेली पोस्ट ऑफिसं अजूनही जिवंत आहेत.

गल्लोगल्ली अध्यात्माची दुकानं लागलेली पाहून आजही तुमचं, 'असा मी, असा मी' आठवतं आणि हसू येतं.

"मला सगळ्याच राजकारण्यांचं म्हणणं पटतं" हे अजूनही कित्येकांच्या बाबतीत घडताना दिसतं... अगदी माझ्याही.

आजूबाजूला पसरत चाललेली अराजकता आणि अस्वच्छता पाहून "इंग्रज गेला तो कंटाळून... शिल्लकच काय होतं, इथं लुटण्यासारखं ?" हे नेहमी आठवतं.

एखाद्या टपरीवर चहा घेत असताना नकळत आधी चहाचा रंग पाहिला जातो आणि 'अंतू बर्वा'चा चहाच्या रंगावर मारलेला शेरा आठवतो.

भारत सरकार कडून मिळणारा द्रोणाचार्य पुरस्कार 'चितळे मास्तरां'ना मिळायला हवा, अशी एक भाबडी आशा मनात घर करून आहे.

नवीन घर बांधणारे लोक आजही हातात विटा घेऊन समोर उभे राहताहेत.

एखादी मुलगी कुत्र्याशी लडिवाळपणे बोलत उभी असेल तर 'पाळीव प्राण्यां'चा संपूर्ण अल्बम डोळ्यापुढून झर्रकन निघून जातो.

लग्नाच्या पद्धती बदलल्या, सर्व सोयी उपलब्ध झाल्या, मोबाईलच्या एका क्लीक वर सुपारी पासून भटजींपर्यंत सर्व गोष्टी मिळत असल्या, तरी प्रत्येक मांडवात नारायणाची उपस्थिती असतेच ! त्याला अजून रिप्लेसमेंट मिळालेली नाही.

चाळी जाऊन सोसायट्या आल्या पण गच्चीचा प्रश्न अजूनही तसाच आहे.

जुन्या आणि मोजक्याच शिल्लक असलेल्या काही इराणी हॉटेलांमधून आजही असंख्य 'नाथा' कामात एकटेच झुरत आहेत आणि त्यांच्या वाक्याची सुरवात अजूनही "बाबा, रे" नेच होत आहे.

आजच्या ह्या कॉम्पिटिशन च्या जमान्यात काही 'रावसाहेब'ही आहेत. टिकून नाही, असं नाही... पण, तुमच्यासारखे कलावंत त्यांच्या वाट्याला येत नाहीत. हे जग चालवण्यासाठी अजूनही कोणाला काही करावं लागत नाही.

तुम्ही अनुभव दिलेल्या प्रत्येक गोष्टी आज अस्तित्वात आहेत. पण, तुम्ही नाहीत.

तुमच्या आठवणी, तुमचे किस्से, तुमच्या कथा, तुमची नाटकं, तुमची गाणी, तुमचं संगीत आजही अजरामर आहे... तुकारामाच्या गाथेसारखं...

भाई, तुमच्याशी इमोशनल अटॅचमेंट असणारी बहुधा आमची ही शेवटची पिढी...!

मागे एकदा एका मित्राकडे गेलो असताना त्याने त्याच्या पुस्तकांचं कपाट माझ्यापुढे उघडलं. कपाट कसलं, खजिनाच तो. विविध विषयांची, विविध लेखकांची असंख्य पुस्तकं त्यात आपलं अस्तित्व पणाला लावून उभी होती. पण, त्यातही तुमची पुस्तकं मला चट्कन ओळखता आली... कारण, तुमच्याच भाषेत सांगायचं तर "कोणत्याच पुस्तकाची पानं एवढी चुरगाळलेली नव्हती !"

(लेखक : अज्ञात)
अरण्यातही त्या सीतेला रामांचा सहवास,
घरात राहुन सौभाग्याविण उर्मिलेस वनवास!

सप्तपदी दोघीही चालल्या,कोठे झाली चूक,
तृप्ती एका नशिबी लिहिली दुसऱ्या नशिबी भूक!

लक्ष मनाने लक्ष्मणास ती एकटीच स्मरते,
स्मरण नव्हे ते मरण वाटते प्रतिक्षणी झुरते!

कुंकू आणखी हळदीमध्ये अंतर वर्षे चौदा!
का नियतीचा तिच्यासाठी हा क्रूर असा सौदा!

सीतेप्रमाणे नाही नशिबी आदर्शाची कथा!
अंधाराला कशी दिसावी अडगळीतली व्यथा!

जगास माहित कांचनमृग तो आणि अग्नीदिव्य!
वाल्मिकी नाही वाचू शकले माझे भवितव्य!

लक्ष्मण झाले मुर्छित कळले चौदा वर्षानी!
चौंदा वर्षे आंधळ्यापरी बघते स्पर्शानी !

वनवासातील सर्व श्वापदे जखमी करती इथे!
लक्ष्मण रेषा माझीसुद्धा दिसली कोणा तिथे?

ओलांडून मी गेले नाही चौदा वर्षे वेस!
वाऱ्यावरती नाही उडाला विंचरताना केस!

चौदा वर्षे रावण झाली जगले मी हालात!
नाथाविण मी अनाथ होते, इथे महालात!

रामायण माहीत जगाला ,नाही उर्मिलायण!
वनवासाहून महालात या मी फिरले वणवण!

प्रमोद जोशी. देवगड 9423513604
प्राजक्त

काल एक सुंदर चारोळी वाचली....

'सकाळी अंगणातला पारिजात,
फुलांचा सडा टाकून मोकळा होतो
रिते होण्यातले समृद्धपण,
तो किती सहजपणाने दाखवतो'

कुणाची आहे माहित नाही. पण भावली मनाला. आणि

'प्राजक्त सडा टाकून मोकळा झाला'.

 त्याचा भार हलका झाला. अर्थात....फुलंच ती....इलुशी...नाजुक....त्यांचा भार तो कितीसा असणार ! आणि काहीही झालं तरी 'सृजनाचा' कुठे कधी भार होत असतो का ? 'हलका झाला'... पण म्हणून पोकळी नाही निर्माण झाली. 'मोकळा' झाला पण रिता झाला असेल का खरंच ? मला नाही तसं वाटत ! 'रित' होण्यासाठी 'रिकामं' असावं लागतं मुळात. प्राजक्ताकडे हे रिकामपण नक्कीच नाही. . तो केव्हाच पुन्हा सृजनाच्या त्या सुंदर प्रक्रियेत मशगुल झाला. उद्यासाठी तेवढ्याच कळ्यांना खुलवायचंय....फुलांना फुलवायचंय....प्रत्येकात सुगंधाची कुपी लपवायचीये ...शिवाय देठादेठात केशर !

मातीकडून घेतलेल्या जीवनरसाचं देणं, सुगंधाच्या रूपात निसर्गाला परत करायचंय. उपकारांची परतफेड करायची आहे याची जाणीव आहे त्याला. कृतघ्न व्हायला...तो काही माणूस नाही नं.

जणु ज्या क्षणी ती फुलं फांदीपासून सुटतात, तत्क्षणी तो त्या फुलांवरचे, सारे हक्कही सोडतो...आजची फुललेली सारी फुलं, वर्तमानाच्या त्या क्षणाला वाहून तो मोकळा होतो. गुंतून नाही पडत तो त्या फुलांमध्ये. म्हणून विरहाच दुःख त्याला ठाऊक नाही.आणि म्हणूनच रितेपणाची भावना मुळ धरत नाही.तो अनुभवतो ..ती फक्त बहरण्यातली परिपूर्णता आणि 'देण्या'तलं समाधान.

आपल्यालाही, आयुष्य असंच जगता आलं तर ? तो तो क्षण, वर्तमानाला अर्पण करून टाकायचा. आणि मोकळं व्हायचं त्या क्षणातून ! गुंतून नाही रहायचं त्यात. पुढचा नवा क्षण खुलवायला...फुलवायला... नव्याने सज्ज व्हायचं. फक्त आपलंच नाही तर इतरांचही आयुष्य सुगंधी करायचं.

जमेल का, असं 'प्राजक्त' व्हायला ?

..