Saturday, August 19, 2017

वरुण-वसुचे नाते

 गडगड करूनी, दडदड धावुनी, वरूण राजा येई
आसावली ती वसुंधरा मग, मिठीत अलगद जाई ।

येतो फिरुनी सांगून मजला, गेलास सख्या रे तू
रिझविण्यास मग येऊनी गेले, बाकी सारे ऋतू ।

शरद आला घेऊनी त्याचे,  शुभ्रधवल चांदणे
तयात मी न्हाऊनी निघाले , घालून किती रिंगणे ।

 शिशिर आला घेऊनी संगे, सुखद असा गारठा
शहारले मी, थरथरले मी, चहुकडे हा पर्णसडा ।

कोकीळकूजन, गंधमोहिनी, वसंत ये घेऊनी
त्याच्यासंगे नाचनाचले,  धुंदफुंद होऊनी ।

ग्रीष्माचा तो उष्मा भारी, सृष्टी कोमेजली
मनी माझिया तवभेटीची, आशा अंकूरली ।

ऋतू सारे सवंगडी मज, लोभ असे मजवर
 तुझ्या सरींच्या वर्षावाची, उर्मि मनी नावर ।

भेटीने तव मनी दाटला, गहिवर प्रीतीचा
 होईल आपुले मीलन आला, क्षण हा भाग्याचा ।

पाहुनी ते वरुण-वसुचे, नाते सुंदर प्रेमाचे
सृष्टीलाही वेड लागले, बहरून येण्याचे ।।

                        

No comments:

Post a Comment