तिचा हात हातात घेऊन चालता चालता तो म्हणाला, "मला एकदा तुझे शूज घालून चालायचंय...."
"नको रे, सोपं नाही ते....! तू तुझे कष्ट झेलतोच आहेस ना, आपला प्रवास सुखात चालला आहे ना" ती म्हणाली.
त्याचा हट्ट म्हणून तिने 'तिचे शूज' त्याला दिले. तिच्या शूज मधला त्याचा प्रवास सुरू झाला.
हिरवळीवर चालता चालता अचानक खडे टोचू लागले.
करियरसाठीचा विरोध, नोकरीची वणवण, लग्न ठरल्यावरची द्विधा अवस्था,माहेर सुटल्याचं दुःख, आयुष्याचा संघर्ष पायाला जाणवू लागला.
गरोदरपणातील अस्वस्थता,बाळंतपण,अन् नंतर तो गोंडस स्पर्श.... रात्रीची जागरण,नोकरीतली ओढाताण, तरीही तिने नेहमी त्याच्यासाठी सुंदर दिसण्याचा केलेला प्रयत्न, त्याच्यासाठी वेळ काढायची धडपड,कधी टोमणे कधी कौतुक, जबाबदाऱ्यांचे ओझे जाणवत होतं थोडं थोडं....
केवळ तिचे शूज घालूनसुद्धा काही अव्यक्त सलदेखील आता टोचत होते पायाला.... कधी चटकेदेखील बसले....त्याने झटकन शूज काढले म्हणाला, "कसं चाललीस एवढं...!"
ती हसली; म्हणाली, "तुझ्यासाठी.... माझ्यासाठी.... आपल्यासाठी...!!!
No comments:
Post a Comment