Friday, September 8, 2017

लाखो इथले गुरू...!

बिन भिंतीची उघडी शाळा
लाखो इथले गुरू...
झाडे, वेली, पशु, पाखरे
यांशी गोष्टी करू!

बघू बंगला या मुंग्यांचा,
सूर ऐकुया या भुंग्यांचा

फुलाफुलांचे रंग दाखवील
फिरते फुलपाखरू...
बिन भिंतीची उघडी शाळा
लाखो इथले गुरू!

सुग्रण बांधी उलटा वाडा,
पाण्यावरती चाले घोडा

मासोळीसम बिन पायांचे
बेडकिचे लेकरू...
बिन भिंतीची उघडी शाळा
लाखो इथले गुरू!

कसा जोंधळा रानी रुजतो,
उंदीरमामा कोठे निजतो

खबदाडातील खजिना त्याचा
फस्त खाऊनी करू
बिन भिंतीची उघडी शाळा
लाखो इथले गुरू!

भल्या सकाळी उन्हात न्हाऊ,
कड्या दुपारी पर्‍ह्यात पोहू

मिळेल तेथून घेउन विद्या
अखंड साठा करु
बिन भिंतीची उघडी शाळा
लाखो इथले गुरू!


– ग. दि. माडगूळकर

Monday, August 21, 2017

स्त्री का शपथपत्र

मैं मैं हूँ । मैं ही रहूँगी।

मै नहीं राधा बनूंगी,
मेरी प्रेम कहानी में,
किसी और का पति हो,
रुक्मिनी की आँख की
किरकिरी मैं क्यों बनूंगी
मै नहीं राधा बनूँगी।

मै सीता नहीं बनूँगी,
मै अपनी पवित्रता का,
प्रमाणपत्र नहीं दूँगी
आग पे  नहीं चलूंगी
वो क्या मुझे छोड़ देगा
 मै ही उसे छोड़ दूँगी,
 मै सीता नहीं बनूँगी।

मै न मीरा ही बनूंगी,
किसी मूरत के मोह मे,
घर संसार त्याग कर,
साधुओं के संग फिरूं
एक तारा हाथ लेकर,
छोड़ ज़िम्मेदारियाँ
मैं नहीं मीरा बनूंगी।

यशोधरा मैं नहीं बनूंगी
छोड़कर जो चला गया
कर्तव्य सारे त्यागकर
ख़ुद भगवान बन गया,
ज्ञान कितना ही पा गया,
ऐसे पति के लिये
मै पतिव्रता नहीं बनूंगी
यशोधरा मैं नहीं बनूंगी।

उर्मिला भी नहीं बनूँगी
पत्नी के साथ का
जिसे न अहसास हो
पत्नी की पीड़ा का ज़रा भी
जिसे ना आभास हो
छोड़ वर्षों के लिये
भाई संग जो हो लिया
मैं उसे नहीं वरूंगी
उर्मिला मैं नहीं बनूँगी।

मैं गाँधारी नहीं बनूंगी
नेत्रहीन पति की आँखे बनूंगी
अपनी आँखे मूंदलू
अंधेरों को चूमलू
ऐसा अर्थहीन त्याग
मै नहीं करूंगी
मेरी आँखो से वो देखे
ऐसे प्रयत्न करती रहूँगी
मैं गाँधारी नहीं बनूँगी।

मै उसीके संग जियूंगी,
जिसको मन से वरूँगी,
पर उसकी ज़्यादती
मैं नहीं कभी संहूंगी
कर्तव्य सब निर्वाहुंगी
बलिदान के नाम पर
मैं यातना नहीं संहूँगी
मैं मैं हूँ मै ही रहूँ

Saturday, August 19, 2017

फक्त तू खचू नकोस

एक डाव हरला तरी
त्यात काय  एवढं ..?
कुणीतरी जिंकलंच की
हे ही नसे थोड ...
संधी मिळेल तुलाही,
लगेच हिरमसु नकोस,
आयुष्य खुप सुंदर आहे,
फक्त तू खचु नकोस...
       सूर्य रोजच उगवतो,
       त्याच  नव्या तेजाने ...
       रोज मावळतीला जातो
       रोजच्याच् नेमाने ...
       येणे जाणे रितच् इथली,
       हे तू विसरु नकोस ...
       आयुष्य खुप सुंदर आहे,
       फक्त तू खचु नकोस...
प्रेम तुझ्यावर करणारे ,
कितीतरी लोक आहेत ...
तुझ्यासाठी जोडणारे ,
खुप सारे हात आहेत ...
अरे अशाच आपल्यांसाठी ,
तू ही थोड हसुन बघ ...
आयुष्य खुप सुंदर आहे,
फक्त तू खचु नकोस...
       वाट तुझी बघत असतं,
       रोजच  कुणीतरी ...
       तुझ्यासाठी जगत असतं ,
       आस लावून प्रत्येक क्षणी ...
       त्यांच्यासाठी तुलाही जगायचे,
       अश्रु तू गाळु नकोस ...
       आयुष्य खुप सुंदर आहे,
       फक्त तू खचु नकोस...
उठ आणि उघडून डोळे ,
पहा जरा  जगाकडे ...
प्रत्येकाच्या आयुष्यात ,
काहीतरी असतेच् थोडे ...
नाही नाही म्हणून ,
उगाच कुढत तू बसु नकोस ...
आयुष्य खुप सुंदर आहे,
फक्त तू खचु नकोस...
       सामर्थ्य आहे हातात जर,
       स्वप्ने डोळ्यात घेऊन चल ...
       परिस्थितीशी भिडवून छाती,
       दोन हात करत चल ...
       विजय तुझाच असेल
       तेव्हा मागे वळून बघु नकोस ...
       आयुष्य खुप सुंदर आहे,
       फक्त तू खचु नकोस...

कृष्णा

कृष्णा,
           तुला कसलं संबोधन लावायचं? तू आकाशासारखा वाटतोस मला, आकाश कसं सतत माथ्यावर असतं आपण जिथे जाऊ तिथे सोबत करतं पण त्याचा निळा रंग बोटावर नाही घेता येत…
            खरं म्हणजे तुझं नाव घेतल्यावर तू मानवी रूपात डोळ्यासमोर येतच नाहीस.. आधी येते ती आकाशाची गडद निळाई आणि मग त्यामागोमाग लहरत येतं एक मोरपीस… तुझं मोरपीस!
            तुझ्याइतका मानवी जीवनात मिसळलेला कुठलाच देव नाही बघ! प्रत्येक नातं तू समरसून जगलास आणि वेळ येताच ते नातं त्यागून मोकळाही झालास! कधी परत वळून बघितलंस का रे मागे? तुझ्यामागे त्या माणसांचं काय झालं असेल तुझ्याशिवाय ?
          तुझं सगळंच अतर्क्य! तू प्रचलित नियम मोडलेस. जन्म घेतलास वसुदेव देवकीच्या मथुरेत पण वाढलास नंद यशोदेकडे गोकुळात! दहीदुधाच्या चो-या केल्यास, भलत्या वयात गोपिकांची छेड काढलीस. सुदामा, अर्जुन, उद्धव यांचा मित्र तू होतासच पण द्रौपदीचा सुद्धा 'सखा' झालास. हे सुंदर नातं तू भारतीय स्त्रीला दिलंस. 'बाईचा मित्र' ही संकल्पनाच नव्हती तुझ्याआधी आपल्याकडे, 'तो' स्त्रीचा पिता, पती किंवा पुत्र असावा अशी आपली समाज रीत! विवाहित राधेचा प्रियकर झालास. अगदी प्रेमाचं प्रतिक म्हणून नाव घेताना राधेचं नाव तुझ्याआधी येतं.
         पुढे अष्टनायिकांचा पती झालास तरी जरासंधाच्या तावडीतून सोडवलेल्या सोळा सहस्र स्त्रीयांना अभय दिलंस. तुझ्यानंतरही अनेक वर्षांनी सूरदासांनी तुझं बालपण त्यांच्या पदांतून मांडलं, मीरेने तुला 'नटनागर गिरिधारी' म्हणत साद घातली.
         एक सांग, तू अनेक नाती निभावलीस पण जीव जडवलास तो फक्त राधेवर…! खरं ना? गोकूळ सोडल्यावर परत तू बासरी वाजवल्याचे उल्लेख कुठेच आढळत नाहीत.
         गीतेत 'यदा यदा हि धर्मस्य' म्हणत तू परत येण्याचं वचन दिलं आहेस. पण आता युद्धासाठी नको रे येऊस, आम्ही माणसं म्हणजे एक एक बेट झालोय, यावर नात्यांचे पूल बांधायला ये!
       आणि हो, येताना रुक्मिणीला नाही आणलंस तरी चालेल पण राधिकेला सोबत घेऊन ये, म्हणजे तुझी बासरी ऐकायला मिळेल.
        कृष्णा, पुन्हा एकदा बासरीत सूर भरायला ये!

दुर्गा भागवत

कृष्ण भेटायलाच पाहिजे

कृष्ण भेटायलाच पाहिजे. आयुष्यात प्रत्येक वळणावर कृष्ण भेटायलाच पाहिजे. मनातलं बोलायला, लिहिलेलं वाचायला, रेखाटलेलं दाखवायला, अन् कधी गायलेलं ऐकवायला हक्काचा सवंगडी पाहिजे आणि म्हणूनच प्रत्येकाला एक कृष्ण भेटायलाच पाहिजे मुळात नात्यांच्या पलिकडचे भावबंध जोडणारा.....एक हक्काचा सवंगडी पाहिजे...लहानपणापासून जपलेल्या अनेक नात्यांचीही वयं वाढत असतात त्या नात्यांचे काळाप्रमाणे अर्थ बदलंत असतात तस्संच... ते... पूर्वीचं... निर्व्याज, अबोध नातं पुन्हा जमायला पाहिजे आणि याकरताच आयुष्यात कृष्ण भेटायला पाहिजे...... "तो" कृष्ण "ती" ही असु शकते. आपल्या मनातलं सारं जाणणारी ती असते कधीही आपलं खोलवर मन रीतं करता आलं पाहिजे असा हक्का , विश्वासाचा कृष्ण भेटला पाहिजे........ आपल्या आजुबाजुला तो सापडेलंच असं नाही जोडीदारामध्ये तो गवसेलंच असंही नाही. कुणीतरी जवळचं कृष्ण असण्याची भावनाही उर्मी देणारी पाहिजे मात्र कधी मनाचा पेंद्या झाला नाही पाहिजे.... सुंदर विचारांची रम्य मुरली छेडणारा पाहिजे
आयुष्यात प्रत्येकाला कृष्ण भेटला पाहिजे......खरंच त्या मुरलीधराकडे मुरली होती का?की अनेकांच्या मनात रुंजणारी त्याची ती अाश्वस्थ मैत्री होती का? त्याच्या अस्तित्वाने अनेक मनांतून उमटत असाव्या आनंदलहरी अाणि त्यांचीच ऐकु येत असावी रुंजणारी मुरली अनेकांच्या मनामधे मुरणारा तो मुरलीमनोहर प्रत्येकाला भेटायला पाहिजे. आयुष्यात प्रत्येक वळणावर कृष्ण भेटायला पाहिजे......
अंजली मायदेव.

वरुण-वसुचे नाते

 गडगड करूनी, दडदड धावुनी, वरूण राजा येई
आसावली ती वसुंधरा मग, मिठीत अलगद जाई ।

येतो फिरुनी सांगून मजला, गेलास सख्या रे तू
रिझविण्यास मग येऊनी गेले, बाकी सारे ऋतू ।

शरद आला घेऊनी त्याचे,  शुभ्रधवल चांदणे
तयात मी न्हाऊनी निघाले , घालून किती रिंगणे ।

 शिशिर आला घेऊनी संगे, सुखद असा गारठा
शहारले मी, थरथरले मी, चहुकडे हा पर्णसडा ।

कोकीळकूजन, गंधमोहिनी, वसंत ये घेऊनी
त्याच्यासंगे नाचनाचले,  धुंदफुंद होऊनी ।

ग्रीष्माचा तो उष्मा भारी, सृष्टी कोमेजली
मनी माझिया तवभेटीची, आशा अंकूरली ।

ऋतू सारे सवंगडी मज, लोभ असे मजवर
 तुझ्या सरींच्या वर्षावाची, उर्मि मनी नावर ।

भेटीने तव मनी दाटला, गहिवर प्रीतीचा
 होईल आपुले मीलन आला, क्षण हा भाग्याचा ।

पाहुनी ते वरुण-वसुचे, नाते सुंदर प्रेमाचे
सृष्टीलाही वेड लागले, बहरून येण्याचे ।।

                        

राधार्पण

ऐन दुपारी कदंबाखाली
कृष्ण अन त्याच्या सहस्त्र पत्नी
रंग उधळूनी रास रचुनी
गोफ गुंफती हरी भोवती

इतक्यात सर्रकन अवचित रुतला
कमल चरणी हरीच्या ,काटा !!
राधा राधा सत्वर वदला
घननीळ नेत्री अश्रू दिसला !

कोमल रुक्मिणी, सुंदर भामा
जांबुवंती अन वदली कमला
बसता उठता राधा राधा
नसे अर्थ का आमुच्या प्रेमा ?

सोळा शृंगार तुझ्याचसाठी
घास मुखी तव आमुच्या आधी
दारी लाविला पारिजात हा
सहस्त्र शैय्या तुझ्याचसाठी

चिडली भामा, रुसली रखमा
बरे नव्हे हे....राधेला विसरा
कोण गोपी ती ? कुठल्या घरची ?
आम्हा समोरी का तिची  मुजोरी  ?

नकोस फसवू , शपथ तुज सखया,
कलंक न हा भाळी लागो तुझिया
राधेसाठी का व्याकुळ कान्हा
बोल काहीतरी....उत्तर द्याया !!

उठले हरी ... मग दूर जाहले ...
टक लावूनी..  अभ्र पाहिले ...
शांत घटका सरली अन् मग,
मंजुळ वाणी बोलू लागले

वृंदावन जेव्हा टाकिलें,
अन् सोडिले राधेला,
पुन्हा न होणे भेट कदापि
माहित झाले भाबडीला.

माग म्हणालो आज काहीही,
माझी आठवण..प्रतिक प्रीतीचे...
बोलली राधिका झुकवून डोळे,
कधी न मागिले आज मागते..

मूर्ती तव मम  मनी सर्वदा,
परी  विनवणी करते तुजला
सल जरी इवला, अंगी रुतला
डंख तयाचा व्हावा मजला !

कमलदल-सम चरणांना तुझिया
पायघड्या मम ह्रदयीच्या व्हाव्या
चाललास जरी दोन पावले,
क्षेम कुशल तव मज धाडाव्या

म्हणून सखये ओठी राधा
दोन  तन, मन एकच गाभा
पाऊल जरी मी एक ठेवले
ती भू नाही ..काळीज स्मरते !!

म्हणून सांगतो.. प्रिय पत्नींनो,
राधा लौकिक अर्थाने मैत्रिण
अर्धांगिनी जरी हरीच्या तुम्ही,
राधा मात्र......माझे 'मी-पण'...

राधे इतकी प्रीती मजवर
आहे कुणी का केली सांगा ?
म्हणून सांगतो निजभक्तांना
कृष्णा आधी बोला राधा...

प्रीतीचे ते सुंदर मंदिर
कशी करावी दूर आठवण?
राधा भरली कणा कणातून
कृष्ण राहिला फक्त राधार्पण.!!